२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
उच्चशिक्षित, उपक्रमशील आणि सर्जनशील शिक्षिकेच्या कार्याची रायगड जिल्हा परिषदेने घेतली दखल
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
विद्यार्थीकेंद्रित व कृतीआधारित अध्यापन पद्धतीचा प्रभावी अवलंब करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व सर्जनशील विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा रोठ खुर्द येथील आदर्श शिक्षिका अमिता गजानन बामणे यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन २०२६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या तब्बल २० वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा हा गौरव मानला जात असून, रोहा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
अमिता बामणे या उच्चशिक्षित असून त्यांनी D.Ed., B.A., B.Ed., D.S.M., M.A., M.Ed., SET (Education), TET व CTET या शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विविध प्राथमिक मराठी शाळांमध्ये विद्यार्थीहिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
विद्यार्थी-शिक्षक आंतरक्रिया वाढवून आनंददायी व परिणामकारक शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, कौशल्याधारित उपक्रम, वक्तृत्व, निबंध, कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे, तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. नृत्य, कला व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये स्वतः सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी CSR निधीचा प्रभावी वापर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य व ICT साधनांचा प्रभावी वापर त्यांनी केला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच विविध बाह्य परीक्षांसाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांचे सुबक, वळणदार व वाचनीय हस्ताक्षर विकसित करण्यासाठी त्यांनी ‘अक्षरशिल्प’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. नियमित लेखन सराव, अक्षररचना मार्गदर्शन, वैयक्तिक मूल्यमापन व हस्ताक्षर स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात लक्षणीय सुधारणा झाली.
‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड, सहभाग आणि सर्जनशीलता वाढविण्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर कृतीसंशोधन करून शोधनिबंध व नवोपक्रम शैक्षणिक परिषदांमध्ये सादर केले. तसेच ‘रोहा ऑनलाइन स्टडी पॅटर्न’ विकसित करून ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात स्वतः मास्क तयार करून गरजूंना त्याचे मोफत वाटपही केले.
समावेशक शिक्षणाच्या तत्त्वानुसार विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देतानाच विशेष शाळांनाही आवश्यक सहकार्य केले. स्वच्छता अभियान, निवडणूक, जनगणना, हागणदारीमुक्त अभियान, कुटुंबकल्याण कार्यक्रम तसेच निसर्ग चक्रीवादळ आणि महाड महापुरातील मदतकार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
महिला दिन, स्तनपान सप्ताह, पालकांसाठी विविध स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आणि समाजातील सहभाग अधिक दृढ करण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गुरुवार, १० सप्टेंबर रोजी महाड येथे पालकमंत्री ना. भरत गोगावले, ना. आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते अमिता बामणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव म्हणजे रोहा तालुक्यातील उपक्रमशील, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.