दिव्यांग मुलांच्या स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा; ‘प्रगती’ कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन!
आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन;
दिव्यांग मुलांसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
दिव्यांग मुलांच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उद्योजकतेची नवी पहाट निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, रोहा संचलित ‘प्रगती दिव्यांग अनिवासी कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा’चे उद्घाटन शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर विधान परिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्या माध्यमातून रोहा येथे गेली वीस वर्षे ‘प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा’ अविरतपणे सुरू आहे. या शाळेतील अठरा वर्षांवरील विशेष मुलांना केवळ शिक्षणच नव्हे, तर त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शासनाकडून व्यवसाय प्रशिक्षणाची मान्यताही प्राप्त झाली आहे. याच प्रयत्नांतून ‘प्रगती’ कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
या उद्घाटन सोहळ्याला रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री अवनी समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद भाई दर्जी, शिक्षण सभापती रवींद्र चाळके, संस्थेच्या अध्यक्षा दर्शना आठवले यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. या मुलांना आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीला निश्चितच बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. मयुरा मोरे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे आमदार अनिकेत तटकरे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
विशेष मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे करण्याचा ‘प्रगती’ केंद्राचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे. दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत त्यांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणारे हे केंद्र रोहा तालुक्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.