दिवाळीच्या आनंदात श्रमजीवी कर्मचाऱ्यांचाही सन्मान! रोशन चाफेकर यांची स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अनोखी स्नेहभेट
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रस्त्यावर घाम गाळणारे हात आणि नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणारे कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचा आनंद फुलावा, या सामाजिक जाणिवेतून भाजपचे नगरसेवक रोशन चाफेकर यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. रोहा नगरपरिषदेतील कायमस्वरूपी व कंत्राटी स्वच्छता कर्मचारी तसेच पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त स्नेहभेट देऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र, शहरातील नागरिकांची दिवाळी स्वच्छ आणि सुरळीत व्हावी यासाठी अनेक कर्मचारी स्वतःच्या सणाचा आनंद बाजूला ठेवून कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची जाणीव ठेवत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस तथा रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे नगरसेवक रोशन चाफेकर यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि स्नेहभेट प्रदान केली.
यावेळी बोलताना रोशन चाफेकर म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसह प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करतात. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील आणि जिल्हा सरचिटणीस सतीशजी धारप यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही छोटीशी स्नेहभेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद कार्यालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांशी, तर आपल्या संपर्क कार्यालयात पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी रोहा तालुका सरचिटणीस परेश चितळकर, संस्कार मोकल, शुभम मोहिते आणि सार्थक राके उपस्थित होते.
केवळ दिवाळीच्या शुभेच्छा नव्हे, तर शहराच्या आरोग्याची आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी सांभाळणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम रोशन चाफेकर यांच्या सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविणारा ठरला. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हीच या स्नेहभेटीची खरी पावती ठरली!