रोहा शहरातील दमखाडी येथील रहदारीचा मार्ग आणि मेन चौकातील तसेच रोहा-कोलाड मार्गावरील नाल्यावरील सुमारे २५ ते ३० वर्षे जुना असलेला स्लॅब गुरुवारी रात्री अचानक पत्त्यासारखा कोसळल्याने घडलेल्या ये दुर्दैवी घटनेत आठ वाहनांचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत वरती उभ्या करण्यात आलेल्या अनेक दुचाकी आणि रिक्षा नाल्यात कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत परिसर तातडीने बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.
तर सदरच्या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, डंपर आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. परिसर सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले असून पोलिसांच्या मदतीने वाहतूक बायपास मार्गाकडे वळविण्यात आली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा वनश्री शेडगे म्हणाल्या, की “दमखाडी नाक्यावरील ही मोरी सुमारे २५ ते ३० वर्षे जुनी आहे. घटनेनंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ठेकेदारांना मोरीची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून शुक्रवारपासून काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “घटनास्थळी जेसीबी, डंपर आदी यंत्रसामग्री पोहोचली असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली आहे. मुख्य पाणीपुरवठा लाईन सुरक्षित असून केवळ एका इमारतीची पाणीपुरवठा लाईन बाधित झाली आहे. त्या इमारतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.”गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच ही जुनी असलेली मोरी जीर्ण झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. “मोरीच्या वरच्या भागावरून इतक्या मोठ्या प्रमाणात स्लॅब खचेल, असा अंदाज आला नव्हता. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल,” असेही त्या प्रसंगी घटनास्थळी म्हणाल्या.
दरम्यान, या मोरीचे आजपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर आल्याने नगरपालिकेच्या देखभाल आणि सुरक्षिततेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नालीसफाईदरम्यानही या मोरीबाबत कोणताही धोका निदर्शनास आला नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. शहरातील ज्या ठिकाणी मोऱ्या व पुलांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, तेथे दुरुस्तीची कामे सुरू असून छत्रपती शिवाजीनगर, मेहेंदळे परिसरासह अन्य भागांतही आवश्यक कामे हाती घेतली जात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
तर सदरच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व जुन्या मोऱ्या आणि पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून संभाव्य धोके टाळावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने नागरिकांना वाहतुकीसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
घटना दुर्देवी आहे. यात बिलकुल शंका नाही.पण मुळात हा नैसर्गिक नाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असून तो नगर पालिकेच्या हद्दीत आहे. असे असताना नगर पालिका या नाल्याच्या बांधकामासाठी निधी खर्च करू शकत नाही का ? सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या नाल्याचे बांधकाम हाती घेणार असल्याचे समजते. मात्र अशा दुर्घटना घडूच नये यासाठी नगरपालिका आणि सा. बा. खाते कोणती अधिक उपाय योजना करतात हे पाहणे गरजेचे असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.