धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा शहरातील धनगर आळी येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा १७वा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व गणेशभक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे स्थान असलेल्या श्री साखरचौथ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही धनगर आळी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रींची स्थापना करण्यात आली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
गणेशोत्सवानिमित्त आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, समाजसेवक प्रमोद म्हसकर तसेच रोहा नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक आणि विविध मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन श्री साखरचौथ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यंदाच्या उत्सवात श्री गणेशपूजा व आरती, महाआरती, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बालगोपाळांसाठी विविध विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिलांसाठी मंगळागौर, भोंडला, संगीत खुर्ची आणि हौजी आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रींचा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री साखरचौथ गणपती बाप्पांचे दर्शन व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उत्सवाचे आयोजन श्री. विकास रमेश साळवी (अध्यक्ष, साखरचौथ गणेशोत्सव मित्र मंडळ), श्री. रमेश विठ्ठल साळवी (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ) आणि श्री. महेंद्र रामभाऊ दिवेकर (उपाध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
ठिकाण : गोलीपकर चौक, धनगर आळी, रोहा
आयोजक : धनगर आळी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ, धनगर आळी



