राजमुद्रा फाउंडेशनच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त रोठ बुद्रुक शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
“आजचे विद्यार्थीच उद्याच्या भारताचे सक्षम शिल्पकार” – अमित घाग
रोहा | प्रतिनिधी : संतोष सातपुते
समाजसेवेची अकरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत राजमुद्रा फाउंडेशनने आपल्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त रोठ बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. शिक्षणाची आवड, चांगले संस्कार, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली, तर ते देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतील. शिक्षण हीच खरी ताकद आहे.”
यावेळी त्यांनी फाउंडेशनच्या अकरा वर्षांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत “नाते सामाजिक बांधिलकीचे” या ब्रीदवाक्यानुसार शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आदी विविध क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य सुरू असल्याचे सांगितले. कोरोना काळात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे चार हजार गरजूंना मोफत अन्नाचे डबे पोहोचविले. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजूंना आरोग्य सेवा आणि रोठ बुद्रुक गावासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
अमित घाग पुढे म्हणाले की, राजमुद्रा फाउंडेशनची रोहा तालुक्यात झपाट्याने वाढ होत असून समाजसेवेच्या कार्यात अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. युवकांचा वाढता प्रतिसाद हीच संस्थेच्या कार्याची खरी पावती असून भविष्यात शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात अधिक व्यापक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील.
कार्यक्रमाला भारतीय जनता युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष नरेश कोकरे, राजमुद्रा फाउंडेशनच्या महिला प्रमुख श्रद्धा घाग, अर्चना पाटील, क्रीडा प्रमुख ओंकार घाग, संघटक सुबोध पाटील, सहसंघटक रितेश घाग, आरोग्यदूत आशिष धुमाळ, सहसंपर्क प्रमुख सागर जोगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जाधव, नाकती मॅडम, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा पत्रकार जितेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी फाउंडेशनच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.