धाटाव एमआयडीसीतील नालेसफाईचा मोठा झोल उघड; लाखो रुपये पाण्यात
रस्त्यावरच केमिकलयुक्त पाणी, ठेकेदारावर कारवाईची भाजपची मागणी , अन्यथा आंदोलन करणार
प्रतिनिधी: सत्यप्रसाद आडाव चणेरा
धाटाव औद्योगिक वसाहतीत पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामात मोठा झोल झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कागदोपत्री नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ, कचरा व साचलेले रासायनिक अवशेष न काढल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून कारखान्यांबाहेर पाणी साचल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रोहाडाय, प्रिव्ही, निलिकॉन, मजदा, आयन एक्सचेंज, अंशुल, सेंफ्रुट्रान्स, बॅक केमिकल्स आदी अनेक कारखान्यांच्या बाहेरील नाल्यांमध्ये पावसाचे व रासायनिक पाणी तुंबले असून अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाले आहेत. परिणामी रस्त्यावर हिरव्या रंगाचे केमिकलयुक्त पाणी साचले असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे कामगार, शाळकरी मुले, शेतकरी, महिला तसेच स्थानिक नागरिकांना याच केमिकलयुक्त पाण्यातून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. काही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनाही कार्यालयात जाताना या साचलेल्या पाण्यातून चालत जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अनेक कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनीही यावर्षी नालेसफाईचे काम समाधानकारक झाले नसल्याचे सांगितले. काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढून तो नाल्याच्या कडेलाच टाकण्यात आला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे तोच गाळ पुन्हा नाल्यात वाहून गेल्याने संपूर्ण नालेसफाई केवळ दिखाऊ ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याचे बिल अदा करू नये, अशी मागणी भाजपचे धाटाव विभाग अध्यक्ष सचिन मोरे यांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष न दिल्यास भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सचिन मोरे यांनी दिला आहे.
औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर लाखो रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना केमिकलयुक्त पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.
दरम्यान, या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता निशिकांत गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यावर्षी नियोजनानुसार नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी गटारांची कामे सुरू असल्याने अथवा काही भागात किरकोळ कामे बाकी असू शकतात. अशा ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती नालेसफाई व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.