सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण”
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा
सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांच्या सोयीसाठी बोरघर येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या माध्यमातून काळभैरव मंदिर परिसरात नव्याने बसविण्यात आलेल्या बाकड्यांचे रविवारी संपादक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झाला.
गावातील प्रणित भागातील नागरिक व युवक मंडळाने मंदिर परिसरात बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सामाजिक भावनेतून मंदिर परिसरात बाकडे बसविण्यात आले. त्यामुळे मंदिरात येणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महेंद्र मोरे, क्रीडा समन्वयक रवींद्र कान्हेकर, ज्येष्ठ नागरिक अर्जुन भगत, पत्रकार उद्धव आव्हाड यांच्यासह गावातील अनेक तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संपादक राजेंद्र जाधव यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत, “समाजात परिवर्तन घडवण्यासाठी मोठ्या संख्येची नव्हे, तर सामाजिक जाणीव असलेल्या मूठभर लोकांची गरज असते. तरुणांनी विविध क्षेत्रांत यश संपादन करून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे बोरघरमध्ये सामाजिक कार्याची नवी प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.