रोहा नगरपरिषदेत AI पोस्टवरून राजकीय वातावरण तापले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधातील कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी भाजपाचा महेश कोलाटकरांविरोधात जोरदार निषेध
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा नगरपरिषद परिसर सोमवारी राजकीय घोषणांनी दणाणून गेला. मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्या विरोधात एआय (AI) माध्यमातून तयार करण्यात आलेली कथित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी नगरसेवक महेश कोलाटकरांविरोधात आक्रमक आंदोलन छेडले.
रोहा तालुका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढो…”, “महेश कोलाटकर हाय हाय…” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. काही काळ रोहा नगरपरिषद परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पोस्ट ही केवळ आक्षेपार्ह नसून महायुतीतील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न आहे. संबंधित पोस्ट हटविण्याबाबत समज देण्यात आली होती, तसेच नगराध्यक्षांनी ती पोस्ट डिलीटही केली होती. मात्र, त्यानंतरही नगरसेवक महेश कोलाटकर यांनी पुन्हा तीच पोस्ट शेअर केल्याचा आरोप त्यांनी केला.
“मी पोस्ट काढणार नाही, जा काय करायचं ते करा,” अशा शब्दांत भाजप कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करत अमित घाग यांनी संताप व्यक्त केला. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात कोणतीही आक्षेपार्ह भाषा किंवा पोस्ट सहन केली जाणार नाही. यापुढे कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही पक्षाविरोधात नसून समाजात द्वेषपूर्ण आणि विकृत विचारांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीविरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांशी वापरण्यात आलेल्या कथित अरेरावीच्या भाषेविरोधातही भाजपने तीव्र निषेध नोंदवला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष Dhairyashil Patil तसेच जिल्हा महामंत्री Satish Dharap यांना देण्यात आली असून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू असल्याचे अमित घाग यांनी सांगितले. महायुतीतील इतर घटक पक्षांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात चांगले काम करत आहे. अशावेळी कोणीही वातावरणात मिठाचा खडा टाकू नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या आंदोलनात भाजप रोहा तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, शैलेश रावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक रोशन चाफेकर, नरेश कोकरे, परेश चितळकर, नदेश यादव, रघुनाथ कोस्तेकर, रिया कासार, अपर्णा सुटे, मृणाल पेंडसे, रवींद्र तारु, हृषीकेश किरजत, ज्ञानेश्वर जाधव, हाजी कोठारी, वैभव कुलकर्णी, अनिल घरजाले, सनिल ईगावले, सार्थक राके, मनीषा फडके, सुरेखा कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.