Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा दीपस्तंभ  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगडमध्ये भाजपला मोठे करण्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पनवेल (प्रतिनिधी) सामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसं पोहोचावं, याचं तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय. संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या बळावर एखादा व्यक्ती जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवू शकतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं आहे. ज्या रयत शिक्षण संस्थाने त्यांना घडवलं, संस्कार दिले, जीवनाला दिशा दिली; त्याच मातृसंस्थेला आजवर तब्बल १३५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांनी आधुनिक काळातील ‘एकलव्य’ ही ओळख अक्षरशः सार्थ ठरवली आहे. ही केवळ देणगी नाही, तर शिक्षण, संस्कार आणि गुरूऋणाप्रती असलेली त्यांची अथांग कृतज्ञता आहे. आज आपण करत असलेला हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाही; तर सामान्य माणसामध्ये दडलेल्या असामान्य शक्तीचा, जिद्दीचा आणि समाजाप्रती समर्पणाच्या भावनेचा गौरव आहे. आपल्या यशाचं शिखर गाठल्यानंतरही ज्याने आपल्या मातीशी, आपल्या संस्थेशी आणि आपल्या लोकांशी असलेली नाळ जपली, त्या व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. जसा महाभारतातील एकलव्याने आपल्या गुरूसाठी सर्वस्व अर्पण केले, तसेच आपल्या कार्यातून समाजऋण फेडणारे, शिक्षणाला जीवनाचे सर्वोच्च साधन मानणारे आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर हे खऱ्या अर्थाने आधुनिक युगातील ‘एकलव्य’ आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवे नोड येथे केले.  

गोरगरिबांचे आधारस्तंभ ,सर्व समाजाचे प्रेरणास्थान, थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था संचलित रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल च्या नवीन अत्याधुनिक इमारतीचा उद्घाटन सोहळा उलवे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील हजारो मान्यवर, हितचिंतक, आणि जनसागराच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मान चिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे अभिष्टचिंतन झाले. यावेळी हजारो मान्यवर हितचिंतक नागरिकांनी उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. 

          उलवे नोड, सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर मैदानावर झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक मंत्री ऍड.आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी, फलोत्पादन व खारजमीन विकास मंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते व समितीचे कार्याध्यक्ष जे.एम.म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक व नगसरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, पनवेल महापालिका सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 गरीब कुटुंबातून संघर्ष करत समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण, सामाजिक सेवा, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र तसेच आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध माध्यमांतून समाजासाठी भरीव योगदान दिले आहे.  हजारो युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक आधार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उभ्या राहिल्या. राजकारणात सक्रिय राहूनही समाजकारणाला नेहमी अग्रक्रम देणारे नेतृत्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रामुख्याने ओळख कायम राहिली आहे.  साधेपणा, व्यापक जनसंपर्क, सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यामुळे ते महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. अशा समाजप्रिय नेतृत्वाचा अमृत महोत्सव म्हणजेच लोकसेवेचा महोत्सव म्हणून साजरा झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवास, संघर्ष, सामाजिक कार्य आणि राजकीय वाटचालीचा आणि कार्याचा गौरव करणाऱ्या व विस्तृत आढावा घेणाऱ्या ‘रामपर्व’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्षणी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत आनंद व्यक्त केला. तसेच उलवे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. प्रशस्त वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षणसुविधा, आधुनिक क्रीडांगण आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे ही संस्था परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी दिशा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील हजारो मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला अभूतपूर्व उंची प्राप्त झाली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा भव्य सोहळा समाजसेवा, शिक्षणप्रेम, सामाजिक ऐक्य आणि लोकहिताचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. ते पुढे म्हणाले १३५ कोटी रुपये आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्याठिकाणी आपली मदत देत नाहीत, त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुने न मागता देणारे असा प्रकारचे रामशेठ ठाकूर आहेत. आणि हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत आणि त्यांचा प्रवासदेखील थक्क करणारा आहे. साधी नोकरी करत असताना त्यांना सिडकोचे १० हजार रुपयांचे काम करण्याची पहिली संधी मिळाली. या कामासाठी त्यांनी घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरुन ५ हजार उचलले आणि पहिल्यांदा ते काम केलं व पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी अडीच हजार रुपये नफा कमवला. ज्यावेळी साडेचारशे रुपये पगार होता, त्यावेळी अडीच हजारचा नफा कमवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या लक्षात आलं की ही नोकरी तर करायचीच आहे, पण मोठे व्हायचे असेल तर हे कामही करावे लागेल आणि मग ५० हजार रुपयाचं काम, १ लाखाचं काम असे करता-करता ते आपले काम वाढवत गेले. ज्यावेळी सिडकोनं त्याकाळात १ कोटी रुपयाचं काम काढलं त्यावेळी फक्त मोठे कंत्राटदार हे १ कोटीच काम करु शकणार होते, मग लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या विरुद्ध जावून एक मोठं आंदोलन उभारलं आणि सांगितलं याचे पार्ट करा, हे काही एक काम नाही आहे, याचे पार्ट करु शकता आणि इथल्या सगळ्या भुमिपूत्रांना एकत्रित करुन सगळ्यांना थोडं थोडं काम देवून ते काम त्याठिकाणी पूर्ण केलं आणि त्यातून भूमिपुत्र कशा पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. सिडको आला तेव्हा सिडकोला विरोध खूप होता. कोणी ऑफिस द्यायला तयार नव्हतं. रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं, माझ्याकडे ऑफिस सुरु करा, त्याच्याकडं ऑफिस सुरु झालं, त्याच्यावर मोठा मोर्चा त्या काळामध्ये गेला. तो मोर्चा गेल्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं मोर्चा याकरीता आला कि तुम्ही आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत आणि त्याच ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही स्थानिकांना नोकऱ्या देतो आणि तिथल्या तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या व तेथून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपला संघर्ष सातत्याने पुढे नेला. ज्यावेळी मोठं काम जेएनपीटी पोर्टचं निघाला तोपर्यंत कंपनी बऱ्यापैकी स्थापन झाली होती, खूप मोठ काम होतं आणि गणेश नाईक साहेबांनी आपल्या मुलाला त्याठिकाणी पाठवलं व सांगितलं की मोठं काम आलं आहे आणि हे काम रामशेठ ठाकूर हेच करु शकतात, रामशेठने ते काम करावं, रामशेठ ठाकूर विदेशात होते, त्यांना विदेशात फोन लावला, ते म्हणाले मी हे काम करीन आणि मग त्यावेळी पोर्टचं मोठ त्या काळचे जेवढे मोठे मोठे कंत्राटदार होते त्या सर्वांना मागे टाकून वेळेत काम पूर्ण करण्याचे त्याठिकाणी काम हे रामशेठ ठाकूरांनी करुन दाखवलं आणि त्यातून ही जी कंपनी आज इतकी मोठी आपल्याला पाहायला मिळते ती कंपनी त्यांच्या मेहनतीतून व जिद्दीने उभी करुन दाखविली आणि भुमिपुत्रदेखील काम करु शकतात तेही उत्तम व जिद्दीने उभी करुन दाखविली आणि भुमिपूत्रदेखील काम करु शकतात तेही उत्तम काम करु शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने रामशेठ ठाकूर यांनी केले.  एकीकडे स्वतःचा व्यवसाय सुरु होता, त्यासोबत स्व.दि.बा.पाटीलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर त्याठिकाणी सहभागी होते. ८० च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कोणाचीही जमिन उचलली की ती घेवून टाकायची त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं, त्यांना काही मिळालं तर ठिक नाही मिळालं तर ठिक तुम्ही लढत रहा, अशा पद्धतीचे या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्व.दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निभावली आणि टप्याटप्याने प्रत्येक आंदोलनामध्ये भुमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले. जमिनी मिळाल्या, साडेबारा टक्केचा निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला अशा वेगवेगळ्या गोष्टी सातत्याने संघर्षाची फार मोठी गाथा ही लोकनेते रामशेठ ठाकूरांची आहे आणि त्यामुळे भुमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिले. हा असा नेता होता की जो डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. रामशेठ ठाकूर असे व्यक्ती होते ज्यांनी ५१-५२ व्या वर्षी घोषित करुन टाकले की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी निवडणूक लढणार नाही, खरं म्हणजे अनेक निवडणूक ते जिंकू शकले असते पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करीत राहिले. रायगड जिल्ह्यातील नवी मुंबईच्या भागातील सर्व विकासामध्ये त्यांचे जे योगदान आहे, हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई या रायगड जिल्हा व नवी मुंबईमध्ये करणार आहेत. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावे लिहिली जातील त्यातले एक नाव हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे असेल असे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचा गौरवही केला. संयमी, शिस्तबद्ध आणि लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

      केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन कार्याचा आलेख मांडला. आजची उपस्थिती पाहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर मनापासून व हृदयावर प्रेम करणारे कार्यकर्ते पाहायला मिळाले. कर्तृत्व, नेतृत्व यांचा अनोखा संगम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात पाहायला मिळतो. गाव, गरीब माणूस, शेतकरी, कामगार यांच्या हक्काच रक्षण करण्यासाठी त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी आपले आयुष्य खर्च केले. या परिसरात भाजपची ताकद नगण्य होती. मात्र रामशेठ ठाकूर यांच्यामुळे भाजपचा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ उद्योजक नसून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे आणि विकासाला गती देणारे कणखर नेतृत्व आहेत,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा गौरव केला. १९९५ च्या काळात कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेली मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि उड्डाणपुलांची कामे रामशेठ ठाकूर यांच्या धाडसी सहकार्यामुळेच पूर्ण होऊ शकली, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितले. नामदार गडकरी पुढे म्हणाले की, रामशेठ ठाकूर यांनी जेएनपीटी आणि सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. विकासाची फळे स्थानिक माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत, हा त्यांचा विचार मोलाचा आहे. त्यांनी कामात कधीही बेमानी केली नाही त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन रामशेठ ठाकूर हे लोकनेता झाले. आज देशामध्ये पैसेवाले कमी नाहीत, पण देण्याची वृत्ती फार थोड्या लोकांमध्ये आहे. रामशेठ ठाकूर यांच्याकडे ती दानत मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. ते कॉट्रक्टर जरुर आहेत, पण सर्व प्रथम त्यांना भूमिपुत्रांची काळजी आहे. रामपर्व ही जीवनाची सुरुवात आहे आणि शतायुषी होईपर्यंत हा रामपर्व युग असाच चालत राहिल, असा विश्वास नामदार गडकरी यांनी  व्यक्त केला. आज सत्तेच्या खुर्चीला फारच चिकटून बसतात. नगरसेवकाला आमदार व्हायचं असतं, आमदाराला मंत्री व्हायचं असतं, मंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं असे अतृप्त असणे आजच्या राजकारणात पाहायला मिळतात. मात्र दोन वेळा खासदार होवूनही वयाच्या ५२ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणारे रामशेठ ठाकूर यांचा आदर्श सर्वच राजकारणांनी घ्यावा, असे नमूद करतानाच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा १०० वा वाढदिवस याच मैदानावर व्हावा, असा विश्वास व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या यशामध्ये त्यांच्या धर्मपत्नी शंकुतलाताई ठाकूर, चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांचेही योगदान असल्याचा आवर्जून उल्लेख नामदार नितीन गडकरी यांनी केला.

         सत्कारमूर्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले. माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे त्यामुळेच मी मोठा झालो आहे. ७५ वर्ष पूर्ण झाली या ७५ वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. १० हजाराच काम, १२ हजाराचं काम, गाढवावर माती वाहून नेण्याचं काम ही सगळी कामे केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. ८१ चे आंदोलन ८४ चं आंदोलन यामध्ये सहभाग घेतला. ८१ च आंदोलन ज्यावेळी जासई नाक्यावर झालं. भगत साहेबाचं डोक फुटल, श्रावणशेठ कोळी, आदरणीय दि.बा. पाटील साहेबांना मार बसला. त्यावेळेला मी आंदोलनात होतो आणि ८४ च्या आंदोलनात ज्येष्ठ नेतेमंडळींना तुरुंगात डांबलं गेले आणि पाटील साहेबांनासुद्धा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले  तेव्हा ८४ चे आंदोलन पुढे नेण्याकरीता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी, दशरथ ठाकूर, बी.के. ठाकूर आणि भारती पोवार त्यावेळेला नेतृत्व करुन ते ८४ चे आंदोलन आम्ही पुढे नेले. लोकांच्या आशीर्वादाने, सहकार्याने त्यात आम्ही यशस्वी झालो. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या कर्तृत्वाचा प्रामुख्याने उल्लेख केला. आपले सर्वांचे सहकार्य त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन त्यामुळे पुढील १०-२० वर्षे काम करण्याची उर्जा मिळाल्याचा उल्लेखही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केला. आयुष्यात जे आपण काम करत असतो त्यांची नोंद आणि दखल ही घेतली जात असते.

त्यांतून आज आपल्या सर्वाचे सहकार्य आणि प्रेमामुळे येथ पर्यंत पोहोचलो आहे. काम करत असताना गावागांवातील लोकांना सोबत घेवून काम करत राहीलो, त्यामुळे स्वतः बरोबर लोकांचेपण भले झाले. लोकांचे सहकार्य मिळाले. त्यातूनच या परिसरात प्रकल्प उभे राहून विकास झाला आणि स्थानिक भूमीपुत्राला देखील त्यांचे हक्क मिळाले, असेही त्यांनी या निमिताने नमूद केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी केले. त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडला. त्याचबरोबर रामशेठ यांच्या परिस्पर्शाने दगडाचेही सोने होते त्यामुळेच माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोन वेळा आमदार झाल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us