वरसे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचा गंभीर प्रश्न; बोगस
बिलांचा संशय ? नागरिक संतप्त
रोहा:(समीर बामुगडे )
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. नाकोडा किराणा माला परिसरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खाली गटार असून वर केवळ डांबराचा थर टाकण्यात आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहतूक करताना वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वेळा निधी मंजूर झाला, तसेच काम पूर्ण झाल्याची बिलेही काढण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली आहे. त्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि बोगस बिलांचा प्रकार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे संबंधित ठेकेदार हे काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळेच निकृष्ट दर्जाचे काम करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता आणखी धोकादायक बनणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंचायत प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.


