रोह्यात कुंडलिका नदी प्रदूषणाविरोधात नागरिकांचा आवाज; तहसीलदारांना निवेदन सादर
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा शहरातील कुंडलिका नदीत नागरी वस्तीतील गटारांचे सांडपाणी तसेच रासायनिक मिश्रित घाण पाणी थेट सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर “कुंडलिका नदी बचाव संघर्ष समिती”च्या वतीने रोह्याचे तहसीलदार श्री. किशोर देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुंडलिका नदी पात्रात कोणतीही प्रक्रिया न करता गटारातील सांडपाणी व इतर घाणेरडे द्रव्य सोडले जात असून यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कारावास व दंडाची तरतूद आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
रोहा शहरात वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा वापर व सांडपाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही बाब नगरपरिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांकडून केवळ औपचारिक प्रतिसाद मिळत असून प्रत्यक्षात सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने पावले उचलण्यास भाग पाडावे तसेच टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने तहसीलदारांकडे केली आहे. कुंडलिका नदीचे पुनर्जीवन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सदर समिती सुमारे दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेली असून नोंदणीकृत नसल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.
यावेळी कुंडलिका नदी बचाव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, विजय देसाई, सुधीरकुमार यादव तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती महिला व बालविकास मंत्री आमदार आदिती तटकरे, जिल्हाधिकारी रायगड, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी धाटाव तसेच रोहे-अष्टमी नगरपरिषद यांना पाठविण्यात आल्या आहेत.


