रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार!
उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
येत्या ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार असून, उत्सवाला अवघे १९ दिवस शिल्लक असताना रोहा तालुक्यातील गोविंदा पथकांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. गावोगावी मंदिरांसमोर, शाळांच्या पटांगणात तसेच मोकळ्या मैदानांवर ७ ते ८ थरांचे मानवी मनोरे रचण्याचा थरारक सराव सुरू असून, गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा तालुक्यातील कालभैरव बोरघर, जय बजरंग लाढंर, तळाघर, निवी, धाटाव, किल्ला, रोठ खुर्द, देवकान्हे, नागोठणे, आमडोशी, कडसुरे यांसह अनेक गावांतील गोविंदा पथकांनी यंदाच्या दहीहंडीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पथकात साधारण १०० ते १२० गोविंदा सहभागी होत असून, आपल्या गावाच्या नावाला मान मिळवून देण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचण्याचा निर्धार केला जात आहे.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून पथकांचा नियमित सराव सुरू आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत जवळपास दोन तास गोविंदा मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत. दिवसभराची कामे आटोपून, शेतातून तसेच कामावरून परतल्यानंतरही अनेक गोविंदा सरावाला प्राधान्य देत आहेत.
“एक थर वाढवायचा, पण सुरक्षिततेची काळजी घ्यायची” या उद्देशाने अनुभवी गोविंदांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जात आहे. त्यामुळे यंदा कोणते पथक किती उंच मानवी मनोरा रचणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.
शहरातील दहीहंड्यांकडेही लक्ष
रोहा शहरात दरवर्षीप्रमाणे श्री सुनील तटकरे प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन केले जाते. तसेच शिंदे शिवसेनेतर्फेही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र श्री प्रमोद म्हस्कर प्रतिष्ठानतर्फे सर्वात मोठी दहीहंडी आयोजित होणार का? याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोणती हंडी सर्वात मोठी ठरणार आणि कोणते गोविंदा पथक सर्वाधिक उंच मानवी मनोरा रचून विक्रम करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोह्यात यंदा दहीहंडीचा थरार अधिकच रंगणार, हे निश्चित!