मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले : मनिष तुरे यांचे दुर्दैवी निधन
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव
वरळी कोळीवाडा परिसरातील रहिवासी मनिष विठोबा तुरे (वय ४२) यांचे उपचारादरम्यान शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनिष तुरे यांच्यावर जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वभावाने अत्यंत मनमिळावू, परोपकारी आणि प्रत्येकाला आपलंसं करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. समाजातील अनेकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवून होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.
मनिष तुरे यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार आहेत. तसेच उत्तरकार्य मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी वाल्मीक चौक, प्रल्हाद वरळीकर, बिल्डींग नं. ४७ रूम नंबर ५ वरळी कोळीवाडा येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने वरळी कोळीवाडा परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


