NEET पेपरफुटीविरोधात रोहा प्रेस क्लब रणांगणात; सोनम वांगचुक यांच्या लढ्याला रोह्यातून अन्नत्यागाचा एल्गार
कोलाड :- श्याम लोखंडे
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात आता रोह्यातूनही संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला. परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण व्यवस्थेतील गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसत असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य प्रदेशहून नागपुरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय आकांक्षा चतुर्वेदी हिने “पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नाही” अशी चिठ्ठी लिहून जीवन संपविले. त्यानंतर १८ वर्षीय सुशील धागे या विद्यार्थ्याने फेरपरीक्षेच्या कठीण पातळीमुळे नैराश्यात जाऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. राजस्थान, गोवा आणि दिल्लीसह विविध राज्यांतही परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे.
दरम्यान, NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि परीक्षा पद्धतीत आमूलाग्र सुधारणा व्हावी, या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा आज विसावा दिवस आहे.
या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी नदी संवर्धन गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी केले आहे.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही. पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था हीच काळाची गरज आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.