रायगड जिल्ह्यात आक्रोश मोर्चासाठी जोरदार तयारी; कार्यकर्ता बैठकीत महत्त्वाचे निर्णय
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रायगड जिल्हा व्यापक कार्यकर्ता बैठक सोमवार, 23 मार्च रोजी तळवली (कोलाड) येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात उत्साहात पार पडली. आगामी 16 एप्रिल रोजी मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालय, बांद्रा येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी व्हावेत यासाठी गावस्तरावर तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र बैठका घेऊन सहभागी कामगारांची संख्या निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. असंघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीस भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सचिव अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले. तसेच बांधकाम विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास सुतार व सचिव संतोष सुतार यांनी मोर्चा नियोजनाबाबत आपले विचार मांडले.
यावेळी डि. पी. सोनवणे, नामदेव सुतार, शैलेश पिंपळकर, अंकित सुतार यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील गाव प्रतिनिधी, औद्योगिक पदाधिकारी व पोर्ट पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीस एकूण 57 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


