रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
रायगड/ प्रतिनिधी
समुदाय सुरक्षा, आपत्ती पूर्वतयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आपल्या बांधिलकीचा भाग म्हणून, रिलायन्स फाउंडेशनने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा प्रशासनाला इंजिन बोटसह पूर बचाव नौका व अत्याधुनिक आपत्कालीन बचाव साहित्य प्रदान केले. या साहित्याचे वितरण रायगड पोलिसांतर्फे नुकत्याच पार पडलेल्या ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ कार्यक्रमात आरसीएफ सभागृह, कुरुळ, अलिबाग येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास पालकमंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा सह पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबाग नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा मानसी म्हात्रे, रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणेचे प्रेसिडेंट शशांक गोयल, कॉर्पोरेट अफेयर्स हेड अनिल डांगी, कॉर्पोरेट अफेयर्स डी.जी.एम. रमेश धनावडे, प्रसंजीत दास, अविनाश कदम, नाईसा जेकब, इन्व्हॉयरमेंट विभागाच्या अमी मेहता, सी.एस.आर विभागाचे रॉयस्टन सेरिओ, वरदा कुलकर्णी, व्यवस्थापन प्रमुख रोहिताश शर्मा, हर्षद घासे व सर्व कॅड टीम, पोलीस निरीक्षक सागर पवार, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, विविध बचाव पथकांचे प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
रिलायन्स फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आउटबोर्ड मोटरसह फुगवता येणारी बचाव नौका, लाईफ जॅकेट्स, रेस्क्यू हेल्मेट्स, रेस्क्यू रोप्स, आपत्कालीन प्रकाश व्यवस्था उपकरणे, वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE) तसेच शोध, बचाव आणि मदत कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनेक अन्य विशेष उपकरणांचा समावेश आहे. हे साहित्य पूर, दरड कोसळणे, रस्ते अपघात, वन्यजीव संबंधित घटना तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी प्रभावीपणे उपयोगी पडणार आहे.
रायगड पोलीस प्रशासन आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला असून, कोकण विभागातील आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असलेल्या बचाव पथके व स्वयंसेवी संस्थांची क्षमता वाढविणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. या साहित्यामुळे आपत्तीग्रस्त भागात जलद, सुरक्षित आणि परिणामकारक बचावकार्य करण्यास मदत होणार आहे. रिलायन्स व्यवस्थापनाने दिलेल्या या मदतीबद्दल माननीय पालकमंत्री भरत शेठ गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांनी रिलायन्स व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले व भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य मिळत राहील अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी बोलताना शशांक गोयल, प्रेसिडेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे असे म्हणाले की, “वेळेवर मदत, आधुनिक उपकरणे आणि सक्षम यंत्रणा यांच्या माध्यमातून आपत्ती पूर्वतयारी मजबूत करणे हे रिलायन्स फाउंडेशनच्या समुदाय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील वचनबद्धतेचे प्रतीक आहे. सक्षम आणि लवचिक समुदाय उभारण्यासाठी प्रशासन, बचाव संस्था आणि उद्योग यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. भविष्यातही जिल्हा प्रशासन व बचाव पथकांसोबत कार्य करून आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध राहील.” तसेच अशाच प्रकारची बोट व बचाव साहित्य याचा दुसरा सेट रिलायन्स नागोठणेच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कंपनीत तयार ठेवलेला आहे याची माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील विविध बचाव व स्वयंसेवी संस्थांना या कार्यक्रमात ‘जीवनदूत’ म्हणून गौरविण्यात आले. आपत्तीच्या काळात जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या या पथकांच्या कार्याचा सन्मान करताना, जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतावृद्धीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या योगदानाचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. रिलायन्स फाउंडेशन हे आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण परिवर्तन, उपजीविका, पर्यावरण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून, सुरक्षित, सक्षम आणि शाश्वत समुदाय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. देशभरातील प्रशासन, संस्था आणि स्थानिक समुदायांच्या सहकार्याने रिलायन्स फाउंडेशन समाजहितासाठी दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य करीत आहे.