गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार!
रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी भाजपा रोहा तालुक्याच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी मोफत मिनीडोअर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी अलिबाग येथे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आ. रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, जनतेच्या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. भाजपा रोहा तालुकाध्यक्ष अमित हरिभाऊ घाग यांनी पुढाकार घेत सलग दुसऱ्या वर्षी गणेशभक्तांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी अमित घाग यांच्या सेवाभावी भूमिकेचे विशेष कौतुक केले.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी रेल्वेने रोहा येथे दाखल होतात. मात्र, रोहा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ग्रामीण भागात जाण्यासाठी वाहनांची गैरसोय निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन अमित घाग यांच्या पुढाकारातून ही मोफत मिनीडोअर सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाळी, तांबडी, घोसाळे, विरझोली आणि भालगाव ग्रामपंचायत परिसरातील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या शुभारंभप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, भाजपाचे नेते सतीश धारपा, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक रोशन चाफेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. ११, १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशभक्तांसाठी ही मोफत मिनीडोअर बससेवा उपलब्ध राहणार आहे. रोहा प्राईड बायपास रोडजवळ बसचा थांबा ठेवण्यात आला असून, रेल्वेने रोहा येथे येणाऱ्या गणेशभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवेसाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी अमित घाग – ९२२६५५५५५९ किंवा सचिन मोरे – ९२७००३५३७८ यांच्याशी संपर्क साधावा.
जनतेच्या अडचणीच्या वेळी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष सेवेत उतरून मदतीचा हात देणारा हा उपक्रम रोहा तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, अमित घाग यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
.