निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली
वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा वीज वितरण कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला निडी येथील ३१ वर्षीय होतकरू तरुण पंकज मढवी याची मुंबई येथे सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. विजेचा जबरदस्त धक्का लागून गंभीररीत्या भाजलेल्या पंकजवर गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने रोहा वीज वितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत पोलावर चढलेला असताना पंकजला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तो गंभीररीत्या भाजला असून त्याच्या डोक्यालाही जबरदस्त दुखापत झाली होती. घटनेनंतर वितरण विभागाचे अधिकारी जतिन पाटील व सहकाऱ्यांनी तातडीने त्याला मुंबई येथे उपचारासाठी हलविले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही पंकजचा मृत्यू झाला.
पंकज मढवी याचे नुकतेच लग्न झाले होते. तो अत्यंत कष्टाळू आणि जबाबदारीने काम करणारा कर्मचारी म्हणून वीज वितरण विभागात परिचित होता. अधिकारी व सहकाऱ्यांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याच्या अकाली निधनामुळे सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पक्ष्यांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर उपाययोजना
धाटाव सबस्टेशनमधून चनेरा, मेढा, रोहा, घोसाळे आदी भागांसाठी फिडर गेले आहेत. रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी पक्षी विद्युत वाहिन्यांवर बसल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. काही वेळा पक्षी विद्युत वाहिनीला चिकटल्यानेही वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. ही समस्या कमी करण्यासाठी विद्युत वाहिन्यांवर बर्ड गार्ड बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
कुटुंबीयांना मदतीसाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न
पंकज मढवी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना वितरण विभागाचे अधिकारी जतिन पाटील यांनी सांगितले की, पंकज हा चांगले काम करणारा कष्टाळू कर्मचारी होता. त्याच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्याच्या पत्नीला नोकरी देण्याबाबतही प्रयत्न व आश्वासन देण्यात आले आहे.
महावितरणमध्ये कायमस्वरूपी वितरण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. कंत्राटी कामगार असला तरी तो वितरण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पंकजच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी वारंवार कर्मचाऱ्यांना फोन न करता सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वारंवार येणाऱ्या फोनमुळे कर्मचारी कामात व्यत्यय येतो तसेच मोबाईलची बॅटरीही संपते. त्यामुळे ग्राहकांनी संयम राखून वीज वितरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.