लांढर शाळेत वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
कष्टाच्या कमाईतून शिक्षणाला हातभार; माजी विद्यार्थ्यांनी सौरभ खेरटकर यांचा आदर्श घ्यावा : पत्रकार जितेंद्र जाधव
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आदर्श लांढर येथील राजिप शाळेत शनिवारी (दि. २०) पाहायला मिळाला. दोस्ती ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सौरभ खेरटकर यांनी स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून विद्यार्थ्यांसाठी वह्या व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत मातृशाळेप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमास रोहा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सुयोग जाधव, साहिल खेरटकर, रोहित जंगम, दैनिक पडवल, सौरभ खेरटकर, शाळेचे शिक्षक दिपक पाटील, शिक्षिका वेदिका सोनकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रिद्धी पेटकर आदी उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पत्रकार जितेंद्र जाधव म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करून सौरभ खेरटकर यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. इतर माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या मातृशाळेचे ऋण फेडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा.”
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. उपस्थितांनी सौरभ खेरटकर यांच्या कार्याचे कौतुक करत अशा समाजोपयोगी उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी दोस्ती ग्रुप आणि सौरभ खेरटकर यांचे आभार मानले. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.