रायगड प्रेस क्लब व कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव.
कर्जत प्रतिनिधी /गणेश पवार
रायगड प्रेस क्लबच्या वतीने आणि संलग्न कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून आयोजित ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा बुधवार (दि. १५ जुलै) रोजी कर्जत तालुक्यातील दुर्गम मार्गाचीवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी पाथरज मार्गाचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी नरदास दामा पारधी तसेच नांदगाव-चाफेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जगन लक्ष्मण पादिर यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत पारंपरिक शेतीला पूरक व्यवसायाची यशस्वी जोड देत प्रगतशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे-शेळके, पंचायत समिती सदस्या कविता पादिर, आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा, कृषी विस्तार अधिकारी विलास कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी गुणवंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, विभागीय सचिव ॲड. राहुल देशमुख तसेच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांनी रायगड प्रेस क्लब व कर्जत प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत पत्रकार हा समाजाचा आरसा दाखवणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे आणि ॲड. राहुल देशमुख यांनी पत्रकार संघटनेच्या कार्याची माहिती देत समाजहितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विस्तार अधिकारी विलास कांबळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी गुणवंत पाटील यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. पीकविमा, सिंचन, यांत्रिकीकरण, विविध अनुदान योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक समृद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी केले व सूत्रसंचालन विद्यानंद ओव्हाळ, आभार विलास श्रीखंडे यांनी केले.
यावेळी कर्जत प्रेस क्लबचे सदस्य संजय अभंगे, दीपक पाटील, मल्हार पवार, मोतीराम पादिर, ज्ञानेश्वर बागडे, विपुल माळी, गणेश पुरवंत, अजय गायकवाड यांच्यासह कर्जत प्रेस क्लबचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार, शेतकरी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी युनायटेड वे ऑफ मुंबई संस्थेचे सहकार्य लाभले. गेली १८ वर्षे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव होत असून, शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन कर्जत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.


