स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहा आणि भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २८ जून २०२६ रोजी मालसई येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत एकूण ४० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये ३२ करंज, ३ वड आणि ५ सुपारी या वृक्षांचा समावेश होता. पर्यावरणाचा समतोल राखणे, भरपूर प्राणवायू उपलब्ध करून देणे, औषधी गुणधर्म तसेच सावलीच्या दृष्टीने उपयुक्त अशा वृक्षांची निवड करून त्यांचे रोपण करण्यात आले.
या उपक्रमासाठी कृषी अधिकारी श्री. महेश गोविलकर यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसईच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मंडळाच्या सदस्यांमध्ये शुभम मोहिते, प्रतीक मालुसरे, रोशन चाळके, श्रवण मोहिते, धनराज चाळके, कुमार धनावडे, करण मराठे, आदित्य मालुसरे, अर्णव, यश, ऋषभ आणि दत्ता यांचा समावेश होता.
याशिवाय स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहाच्या सुमारे ३० ते ३५ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत वृक्षारोपण यशस्वी केले. ग्रामस्थांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहाचे अध्यक्ष श्री. सुमित रिसबूड यांनी कृषी अधिकारी श्री. महेश गोविलकर, भैरवीनाथ क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
पर्यावरण संरक्षणासाठी समाजाने पुढाकार घेत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.