ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे संततधार अनुष्ठान संपन्न; दुपारनंतर वरुणराजाचीही हजेरी
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
पावसाचे आगमन लवकर व्हावे आणि रोहा तालुक्यासह परिसरात पुरेशी पर्जन्यवृष्टी व्हावी, या मंगल हेतूने ब्राह्मण मंडळ रोहा यांच्या वतीने श्री ओंकारेश्वर मंदिर येथे रविवारी (दि. 21 जून) दिवसभर संततधार अनुष्ठान मोठ्या भक्तिभावाने व
धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चाललेल्या या अनुष्ठानाची सुरुवात सकाळी 6 वाजता झाली. वेदमंत्रांच्या पवित्र घोषात आणि सर्व ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली अखंड अभिषेक, पूजन व प्रार्थना करण्यात आली. परिसरातील भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनुष्ठानात सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे, दुपारपर्यंत सुरू असलेल्या या धार्मिक विधीदरम्यान रोहा परिसरात वरुणराजानेही हजेरी लावत रिमझिम पावसाची सर बरसविली. त्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनुष्ठानाच्या फलिताची प्रचितीच जणू निसर्गाने दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमामुळे धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले. अनुष्ठान यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व ब्रह्मवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मण मंडळ रोहा कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पावसासाठी करण्यात आलेल्या या संततधार अनुष्ठानामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, यंदा निसर्गाची कृपा लाभून शेतकऱ्यांचे वर्ष समृद्ध जावे, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.