रोहा नगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात;
नवीन ज्युनिअर कॉलेजसाठी CSR मधून ५ कोटींचा निधी मंजूर.- श्री. रविंद्र चाळके
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सव २०२६ अंतर्गत रोहा नगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. रोहा नगरपालिकेच्या डॉ. सी. डी. देशमुख शिक्षण संकुलातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, रोहा उर्दू शाळा, दमखाडी शाळा, अष्टमी मराठी शाळा व अष्टमी उर्दू शाळा येथे हा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या वेळी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रविंद्र सुधीर चाळके यांनी स्वतः बैलगाडी तूं मुलांना घेऊन शाळेत आले.
या कार्यक्रमास शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रविंद्र सुधीर चाळके यांच्यासह उपनगराध्यक्ष अहमदजी दर्जी, सभापती महेश कोलटकर, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक अरबाज मणेर, अजित मोरे, प्रशांत कडू, स्वीकृत नगरसेवक माज सवाल, दिवेश जैन तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल धनावडे उपस्थित होते.

यावर्षी नगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. नगरपालिका शाळांबाबत नागरिकांचा वाढता विश्वास हा शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त रोहा नगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील आर्थिक भार कमी करून त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या यशामागे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेबरोबरच नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांनी राबविलेल्या विशेष जनजागृती मोहिमेचा मोठा वाटा असल्याचे सभापती रविंद्र चाळके यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
यावेळी बोलताना रविंद्र चाळके यांनी सांगितले की, “रोहा नगरपालिकेच्या शिक्षण संकुलात ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यासाठी तटकरे साहेबांच्या प्रयत्नांतून CSR निधीअंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही आणि शिक्षण संकुलातच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.”
“शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, हेच रोहा नगरपालिकेचे ध्येय आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.