*मनसेचा इशारा: नागोठणेतील धार्मिक कमान तोडफोडीवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण*
प्रतिनिधी दिपक सोनावणे
नागोठणे येथील प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली हजरत मीरा मोहम्मद शहा बाबा यांच्या नावाची कमान १ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर कमान ही नागोठणेतील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय मानली जात होती. अशा प्रकारची तोडफोड ही निषेधार्ह असून समाजात तणाव निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, घटना घडून अनेक दिवस उलटूनही अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती रोहा यांना निवेदन देत या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या ८ दिवसांत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.