“धर्मो रक्षति रक्षितः”च्या घोषणेत रोहा दुमदुमणार; ३ मे रोजी विराट हिंदू संमेलन
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
हिंदुत्वाची चेतना, संस्कृतीचे भान आणि एकतेची ताकद यांचा संगम अनुभवण्यासाठी रोहा शहर सज्ज झाले आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नदी संवर्धन मैदान येथे ‘विराट हिंदू संमेलना चे भव्य आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत रोहेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“रोहेकरांनो, जागे व्हा! एकत्र या!” या जोशपूर्ण हाकेसह आयोजित या संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाची एकजूट मजबूत करणे, सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करणे आणि धर्मजागृती घडवणे हा आहे.
या ऐतिहासिक संमेलनात प्रख्यात अभिनेते व प्रभावी वक्ते शरद पोंक्षे उपस्थित राहून हिंदुत्व, इतिहास आणि वर्तमानातील सामाजिक परिस्थितीवर आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या भाषणाची उत्सुकता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
संमेलनाचे अध्यक्षपद प्रदीप (आप्पा) देशमुख भूषवणार असून, ‘सकल हिंदू समाज, रोहा’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “भेदभावांना मूठमाती देत एकसंघ हिंदू समाज उभारूया” हा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
आयोजकांनी सर्व नागरिकांना कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
रोहा शहरात होणारे हे संमेलन केवळ एक कार्यक्रम नसून, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक जागृतीचा एक मोठा उत्सव ठरणार आहे.

