न्हावे गावात स्नेहसंमेलनाचा जल्लोष; विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार मेजवानी!
प्रतिनिधी – शुभ्रा आडाव, न्हावे
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील न्हावे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. याच दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत न्हावे, नवखार आणि सोनखार गावांतील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
संध्याकाळी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच नितीन डबीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, आंगणवाडी सेविका, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, कोळीगीते, समूह नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून आपल्या कलागुणांचा अप्रतिम आविष्कार सादर केला. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त टाळ्यांची दाद मिळाली. विशेषतः लहानग्या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रसंगी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामुळे शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गणेश बिरवाडकर, सहशिक्षक, केंद्रातील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले. एकूणच, या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून गावात आनंद, एकोपा आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


