रोहा रेल्वे स्थानकाची मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून पाहणी; प्रवाशांसाठी ‘मोठी आनंदाची बातमी’ लवकरच
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा रेल्वे स्थानकाची आज, दि. २५ मार्च रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी भेट देऊन सर्वंकष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान रोहा रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष फैसल अधिकारी व गणेश मासक यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.
पाहणीवेळी महाव्यवस्थापकांनी स्थानकावरील प्रवासी सुविधांबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या कोच इंडिकेटर (Coach Indicators), ‘ट्रेन ऑन डिस्प्ले’ (Train on Display) तसेच नवीन पादचारी पूल (FOB) यांसारख्या अत्यावश्यक कामांना गती देण्यात आली असून ती प्रगतीपथावर आहेत.

यावेळी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वे व रेल्वे बोर्ड (दिल्ली) यांच्या माध्यमातून रोहा रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच एक मोठी आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे संकेत महाव्यवस्थापकांनी दिले. या निर्णयाची अधिकृत घोषणा होताच ती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे समितीने सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी डीआरएम हरेश मीना, कोचिंग विभागाचे मानसपुरे तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, रोहा रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष फैसल अधिकारी व गणेश मासक यांनी रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. समिती प्रवाशांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


