रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेची वार्षिक सभा उत्साहात
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध उपक्रमांसह बालवाडीच्या विस्ताराची मागणी
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेला संस्थेच्या पदाधिकारी व सुमारे ५० महिला सभासदांची उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी सौ. निता हजारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सौ. राजश्री देसाई यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. अध्यक्षा सौ. उषा क्षीरसागर यांनी ऑडिट रिपोर्टचे वाचन केले. यावेळी सौ. नेहा कुळकर्णी व सौ. कविता दळवी यांच्या हस्ते शेअर्स डिव्हिडंडचे वाटप करण्यात आले.
रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातून विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चकली, थालीपीठ भाजणी, तिळगुळ तसेच इतर भेसळमुक्त खाद्यपदार्थ वाजवी दरात उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे परिसरातील महिलांना रोजगाराची संधी मिळण्याबरोबरच ग्राहकांना दर्जेदार पदार्थ मिळत आहेत.
संस्थेची स्वतःच्या मालकीची इमारत असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथे बालवाडीही कार्यरत आहे. बालवाडीतील विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानासोबतच खेळ, मनोरंजन, चित्रकला, कविता, गाणी व नृत्य यांचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या शिक्षिका तसेच महिला पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे.
संस्थेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत बालवाडीचा विस्तार करून पहिलीचा वर्ग सुरू करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासू व कर्तृत्ववान महिला संस्थेच्या कार्यात सहभागी होत असल्याने संस्थेच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.
यावेळी सौ. उषा क्षीरसागर, सौ. निता हजारे, सौ. राजश्री देसाई, सौ. नेहा कुळकर्णी, श्रीमती विजया कोठारी, सौ. कविता दळवी, सौ. माधवी दाते, सौ. ज्योती सनीलकुमार, सौ. सरोजिनी शिंदे यांच्यासह संस्थेच्या महिला सभासदांची उपस्थिती होती.