पिंगळसईचा ‘देशमुखांचा राजा’ ठरतो भक्तीचा केंद्रबिंदू
एक गाव, एक गणपतीच्या भावनेतून गौरी-गणपती उत्सवाला पारंपरिक स्वरूप
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा तालुक्यातील पिंगळसई गावातील ‘देशमुखांचा राजा’ हा गणपती गणेशभक्तांच्या श्रद्धेचे आणि गावाच्या पारंपरिक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवाच्या काळात या बाप्पाच्या दर्शनासाठी पिंगळसई तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
देशमुख कुटुंबाचा पारंपरिक वारसा लाभलेल्या या गणपती उत्सवात ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. ‘एक गाव, एक गणपती’ या भावनेतून ‘देशमुखांचा राजा’ तसेच ‘देशमुखांची आई’ अर्थात गौरी यांची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. त्यामुळे या उत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक एकोप्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सव काळात पारंपरिक आरती, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देशमुख तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ पिंगळसई यांच्या सहभागातून उत्सवाची परंपरा जपली जात असून, विविध धार्मिक उपक्रमांनाही चालना दिली जाते. ‘जाणता राजा मित्र मंडळा’च्या सहकार्याने दत्तजयंतीसह अन्य धार्मिक कार्यक्रमही उत्साहात साजरे केले जातात.
‘देशमुखांचा राजा’ची आकर्षक मूर्ती, देखणी सजावट आणि पारंपरिक वातावरण यामुळे गणेशोत्सवात पिंगळसई गावाला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामस्थांचा एकोपा यांचा सुंदर संगम घडविणारा हा उत्सव दरवर्षी भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.