निरनिराळ्या तापाच्या साथी पसरल्या; ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभेत अध्यक्ष पी. बी. सरफळे यांचे आवाहन
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
रोहा शहरासह परिसरात सध्या निरनिराळ्या तापाच्या साथी पसरल्याने शेकडो नागरिक आजारी पडल्याचे चित्र आहे. त्यातच वातावरणातील सततच्या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. बाहेर पडणे आवश्यक असल्यास शक्यतो कोणाला तरी सोबत घेऊनच जावे, असे आवाहन रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे यांनी केले.
रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना सरफळे बोलत होते. ते म्हणाले की, सध्या कधी ऊन, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील या सततच्या बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असून विविध प्रकारच्या तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
यावेळी एस. टी. महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या कार्डाबाबतही चर्चा करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढले असले तरी त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तसेच कार्ड रिचार्ज करण्यास सांगितले जात असल्याची बाब सभेत मांडण्यात आली. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांना योग्य सवलत मिळावी यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ आगार व्यवस्थापकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
सभेत भारतीय स्टेट बँक, रोहा शाखेचे प्रबंधक राकेश कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग व्यवहार तसेच पेन्शनधारकांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन केले. औद्योगिक कामगार पेन्शनधारकांनाही संबंधित लाभ मिळावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गणपतीपुळे सहलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या सहलीचा संपूर्ण प्रवास खर्च दानशूर व्यक्तिमत्त्व तथा माजी नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे आणि विद्यमान नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे यांनी केला. देवदर्शन व सहल व्यवस्थित पार पडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने शेडगे परिवाराचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.
सभेत नवीन सभासद तसेच वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अध्यक्ष पी. बी. सरफळे व उपाध्यक्ष एस. एन. गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ‘आनंद मेळावा’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निमित्ताने मनोरंजनाचे विविध कार्यक्रम तसेच वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय दीर्घायुष्य केंद्र इंडिया (ILCI), पुणे या संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांसाठी ‘आनंद मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर करीत असून, ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष व सचिवांनी केले.
सभेच्या सुरुवातीला सचिव सुरेश मोरे यांनी प्रास्ता
विक केले. खजिनदार प्रकाश पाटील यांनी हिशोबाचे वाचन केले. उपाध्यक्ष एस. एन. गायकवाड यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष पी. बी. सरफळे, उपाध्यक्ष एस. एन. गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील, प्रसिद्धीप्रमुख अरुण करंबे, ज्येष्ठ सदस्य शरद गुडेकर, अनुराधा धुमाळ, मंगेश जोशी, नंदकुमार भादेकर, दिलीप शेवाळे यांच्यासह शेकडो ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.