समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो : ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज
शिक्षणासोबत धर्म, संस्कृतीचे संस्कारही आवश्यक; विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप प्रेरणादायी
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
“विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असताना त्यांना योग्य दिशा दाखविल्यास त्यांचे जीवन आदर्श बनते. शिक्षणासोबत धर्म व संस्कृतीचे शिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो आणि समाजातील नागरिक शिकले तरच समाज सुदृढ बनतो,” असे प्रतिपादन ज्ञानभास्कर, कीर्तनरत्न ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी केले.
पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते आशीर्वचनातून बोलत होते. यावेळी समाजाच्या वतीने ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी, “प्रत्येक समाज आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. समाजाचे आपण देणे लागतो, त्यामुळे समाजाचे ऋण फेडणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक आणि शिक्षकांचे मोठे योगदान असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. सतत शिकत राहिल्याने बुद्धीला चालना मिळते,” असे सांगितले.
रायगड जिल्हा जंगम समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम यांनी पंचक्रोशी जंगम समाजाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. पंचक्रोशीत शिवपाठ सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंचक्रोशी जंगम समाजाचे अध्यक्ष प्रकाश जंगम यांनी समाजाच्या वतीने भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून लक्ष्मणस्वामी जंगम, मनोहरस्वामी जंगम आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने कार्य करण्यात येईल, असे सांगितले.
कार्यक्रमास पंचक्रोशी जंगम समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रिया जंगम, उपाध्यक्ष रघुनाथ जंगम, सचिव प्रमोद जंगम, खजिनदार राजेंद्र जंगम, समन्वयक किरण जंगम, रूपेश जंगम, राहुल जंगम, वीरेंद्र जंगम, सल्लागार काशिनाथ जंगम, मनोहर जंगम, अरुण जंगम, सागर जंगम, मारुती जंगम, सदानंद जंगम आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील जंगम, प्रिया जंगम, महादेव सरसंबे, प्रगती जंगम, विशाखा जंगम आणि नीरज सरसंबे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण जंगम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वीरेंद्र जंगम यांनी केले.
.