तहसीलदारांच्या आदेशानंतरही गायरान अतिक्रमणाचा अहवाल रखडला? वरसे परिसरातील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
रोहा : समीर बामुगडे
रोहा तालुक्यातील वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गुरचरण जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी संबंधित शासकीय जमिनींची मोजणी करून अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या आदेशानंतर पुढील कार्यवाहीचा अहवाल अद्याप सादर झाला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
तहसीलदार कार्यालयाकडून १६ मार्च २०२६ रोजी गटविकास अधिकारी, रोहा यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात वरसे, भुवनेश्वर, निवी, जय धाकोबा तसेच निवी ठाकुरवाडी येथील गायरान व गुरचरण जमिनींची मोजणी करून त्यावरील अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पत्रात मंडळ अधिकारी रोहा व ग्राम महसूल अधिकारी भुवनेश्वर यांचा १३ मार्च २०२६ रोजीचा अहवाल संदर्भ म्हणून नमूद करण्यात आला आहे. तसेच, संबंधित शासकीय जमिनींची मोजणी करून अतिक्रमण हटविण्याबाबत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, तहसीलदारांच्या आदेशानंतर प्रत्यक्ष मोजणीची कार्यवाही कोणत्या टप्प्यावर आहे, त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे का आणि अतिक्रमण असल्यास त्यावर पुढील कारवाई कधी होणार, याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शासकीय गायरान व गुरचरण जमिनींचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने होऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून या प्रकरणी नेमकी काय कार्यवाही करण्यात आली आहे, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.


