पोलीस बांधवांना राखी बांधून घरेलू कामगार महिलांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत घरेलू कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, रायगड जिल्हा यांच्या वतीने रोहा पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी घरेलू कामगार महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. पोलीस आणि समाजातील नागरिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच बंधुभाव, प्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस बांधव हे सण-उत्सवाच्या काळातही आपले कर्तव्य बजावत समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रोहा पोलीस ठाण्यात भावनिक आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी अशोक निकम – सचिव, भारतीय मजदूर संघ रायगड, श्रीमती निर्मला भूतकर – उपाध्यक्ष, घरेलू कामगार संघ महाराष्ट्र प्रदेश, तसेच भारती आंग्रे, राजश्री धीडे यांच्यासह घरेलू कामगार संघाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून पोलीस बांधव आणि समाजातील महिलांमध्ये स्नेहाचा धागा अधिक घट्ट झाला. ‘राष्ट्रहित • उद्योगहित • श्रमिकहित’ या विचारांना अधोरेखित करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श ठरला.