रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या पाठपुराव्याला यश; पनवेल स्थानकावर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची सुविधा सुरू
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
दिवा–रोहा–दिवा MEMU गाड्यांमध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी तसेच पनवेल रेल्वे स्थानकावर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रोहा रेल्वे प्रवासी समितीने रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने केली होती. या मागणीची दखल घेत अखेर पनवेल स्थानकावर MEMU गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
दिवा आणि रोहा स्थानकांवर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पनवेल येथे पाणी भरण्याची सुविधा सुरू झाल्यामुळे गाड्यांमध्ये पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत होणार असून प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या सुविधेसाठी रोहा रेल्वे प्रवासी समितीने रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. समितीच्या मागणीला मिळालेले हे आणखी एक यश असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी समितीचा लढा आणि पाठपुरावा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्री. फैसल अधिकारी व श्री. गणेश मासक यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वेतील स्वच्छतेबाबतही समितीने प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. रेल्वेच्या टॉयलेटची स्वच्छता राखणे ही केवळ रेल्वे प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक प्रवाशाचीही तितकीच जबाबदारी आहे. प्रवाशांनी टॉयलेटमध्ये थुंकू नये, कचरा टाकू नये तसेच वापरल्यानंतर स्वच्छता राखावी. प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासनालाच दोष देण्यापेक्षा प्रवाशांनीही आपली जबाबदारी ओळखून स्वच्छ रेल्वेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या वतीने करण्यात आले.
“प्रवाशांच्या हक्कासाठी, प्रवाशांच्या सुविधांसाठी आणि स्वच्छ रेल्वेसाठी रोहा रेल्वे प्रवासी समितीचा लढा असाच सुरू राहील,” असा निर्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.