टिटवी जंगलात गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांचा छापा; १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे टिटवी गावाच्या जंगल परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी सुरू असलेल्या भट्टीवर पोलिसांनी दि. २३ ऑगस्ट रोजी छापा टाकून सुमारे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान जंगल भागात १२ निळ्या रंगांच्या प्लास्टिक ड्रममध्ये तब्बल २ हजार ४०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आढळून आले. तसेच ॲल्युमिनियमचा गावठी दारू गाळण्याचा सतेला व झाकणी आणि सुमारे १० लिटर गावठी हातभट्टीची दारू असा मुद्देमाल मिळून आला.
जंगल भागातून सदर मुद्देमाल वाहून नेणे अवजड असल्याने प्लास्टिकचे ड्रम, रसायन व इतर साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.