रोह्यात ३० ऑगस्टला प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने भव्य रोजगार मेळावा
जवळपास ५० कंपन्यांची नोंदणी; गरजूंना ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
दक्षिण रायगड जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व एकलव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोहा किल्ला येथील ॐ नमः शिवाय हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी आतापर्यंत जवळपास ५० नामांकित कंपन्यांनी नोंदणी केली असून, सहभागी पात्र उमेदवारांना ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्याच्या ठिकाणीच नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आठवी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित तसेच १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. आयटीआय, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रनिकेतन आदी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय विविध कंपन्यांकडून ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रोहा तसेच पेण, सुधागड, म्हसळा, तळा आणि श्रीवर्धन आदी तालुक्यांतील बेरोजगार युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रमोद म्हसकर यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ / ७०२८०३५४४४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.