केळघर रस्त्याला झाडाझुडुपांचा विळखा : सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ?
* वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल
प्रतिनिधी / राजीव नेवासेकर
मुरुड -केळघर-रोहा रस्त्यावर केळघर दरम्यान दुतर्फा झाडाझुडुपांचा विळखा असून याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? असा सवाल विचारला जात आहे.
या रस्त्यावर झाडी झुडपे वाढलेल्या फांद्या यामुळे मुरुड तालुक्यातील दुर्गम भागातील केळघर भागातील शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत असून संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुरुड केळघर मार्गे रोहा रस्त्यावर मुरुड पासून अंदाजे पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या केळघर रस्त्यावर दुतर्फा झाडी झुडपे आणि वाढलेल्या झाडांच्या फांद्या एस.टी. व अवजड वाहनांची डोकेदुखी ठरत असून फांद्या लागून काही गाड्यांच्या काचा फुटल्या असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या मार्गावर काही काळ एस.टी.सेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागला आहे.
शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून या रस्त्यालगत असलेली झाडी झुडपे हटविण्यात योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.