रोह्यात श्रावणी सोमवारी शिवभक्तांची एकदिवसीय परिक्रमा; पंचक्रोशीतील शिवमंदिरांना जलाभिषेक
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
प्रथम श्रावणी सोमवारनिमित्त रोहा तालुक्यातील शिवभक्तांच्या वतीने एकदिवसीय परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. आपल्या परिसरातील स्वयंभू तीर्थक्षेत्रांचे महत्त्व वाढविण्यासोबतच धर्माचा प्रचार-प्रसार आणि तरुणांमध्ये धार्मिक संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे महादेव मंदिर तळाघर येथून जलाभिषेक व संकल्प करून परिक्रमेची सुरुवात करण्यात आली. वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी, भुवनेश्वर, भुवनेश्वर येथील समस्त जंगम समाज मठ, गांगल मेडिकल परिसरातील ओंकारेश्वर मंदिर, दमखाडी , रोठ खुर्द, वाघेश्वर नगर येथील श्री. चौधरी यांच्या शिव मंदिर स्थळावरून रोठ बुद्रुक, महादेव मंदिर तळाघर पर्यंत अनवाणी प्रदक्षिणा परिक्रमा करण्यात आली.
परिक्रमेदरम्यान पंचक्रोशीतील विविध गावांमधील शिवलिंगांवर जल व बेलपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी परिक्रमावासीयांचे उत्स्फूर्त स्वागत करून चहा व फराळाची व्यवस्था केली.
परिक्रमेच्या मार्गावर काकड आरती, शिवभजन, सत्संग, हरिपाठ आणि आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक शिवभक्तांनी भावपूर्ण वातावरणात सहभागी होत श्री शंभूमहादेवाची सेवा केली. संपूर्ण परिक्रमा भक्तिमय व आनंददायी वातावरणात पार पडली.
भविष्यात या परिक्रमेचे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्याचा संकल्प शिवभक्तांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे परिसरातील धार्मिक स्थळांचे महत्त्व अधोरेखित होऊन तरुणांमध्ये धार्मिकता व संस्कार वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“बोला पार्वती पतये, हर हर महादेव!” असा जयघोष करत परिक्रमेचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला.