यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन, रोहा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन शनिवारी, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आशियाना बिल्डिंग, खारी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अभय शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमास रोह्याचे उपविभागीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुटवड, रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेंडगे, उपनगराध्यक्ष श्री. अहमद दर्जी, नगरसेवक तसेच युवा आधार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तथा संस्थापक डॉ. फरीद चिमावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘युनिटी ऑर्केस्ट्रा’च्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक श्री. राकेश कागडा, श्री. विनोद म्हात्रे आणि दर्पना दिवेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीतांची मैफल रंगवत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती विद्या रोहेकर मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.