रोहा सुपेगाव मार्ग सोमवारपासून खुला होण्याची शक्यता; कामात विलंब झाल्यास ठेकेदारावर कारवाईचा इशारा
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
गेल्या तीन आठवड्यांपासून बंद असलेल्या सुपेगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास येत्या सोमवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपअभियंता अरुण पाटील यांनी दिली.
५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरुड–रोहा–कोलाड प्रमुख मार्गावरील उसरोली फाटा ते तळेखार फाटा (कि.मी. ९ ते ११) या दरम्यान रस्त्याचा मोठा भाग खचला होता. त्यामुळे २० जुलैपासून हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि व्यावसायिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
सध्या बाधित भागाचे खोदकाम, मजबुतीकरण आणि तात्पुरत्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण होताच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपअभियंता अरुण पाटील यांनी दिला.
दरम्यान, नागरिकांनी काम पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. तसेच विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपासून मार्ग सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत रस्ता बंद असल्याने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, आता तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.


