वराठी ठाकूरवाडी शाळेत शिव आधार फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
शिव आधार फाऊंडेशन, रोहा यांच्या वतीने रा. जि. प. शाळा वराठी ठाकूरवाडी येथे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच प्रमुख पाहुणे श्री. रितेश जैन यांचे सुपुत्र हार्दिक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दिगंबर मोरे यांनी केले. प्रास्ताविकात श्री. सुरेश मोरे यांनी शिव आधार फाऊंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नारायण खुळे यांनी श्री. रितेश जैन यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी शिव आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नारायण खुळे, सचिव श्री. निकेश पोकळे, प्रमुख पाहुणे श्री. रितेश जैन, सदस्य श्री. जगदीश मशेटे, श्री. राकेश नलावडे, श्री. सुरेश मोरे, श्री. संतोष सातपुते व श्री. संजय गायकवाड उपस्थित होते.
तसेच उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दिगंबर मोरे, सौ. सोनाली प्रमोद मोरे, बेलवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप काशिनाथ चव्हाण, श्री. गोरखनाथ बाबुराव राठोड तसेच वराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता गणेश कनोजे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सोनाली प्रमोद मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांद्वारे पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.



