जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून उभारलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिराच्या नूतन इमारतीचे लोकार्पण; शिक्षण विकासाला नवी दिशा
प्रतिनिधी /सत्यप्रसाद आडाव
श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्था, सानेगाव-यशवंतखार संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर, चोरढे ता. मुरुड जि. रायगड प्रशाळेसाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या सुसज्ज नूतन शाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे हे होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळू लखमा पाटील, जेएसडब्ल्यू स्टील साळावचे प्लांट हेड पंकज मलिक, सीएसआर विभागाचे सुधीर तैलग, सिव्हिल इंजिनिअर प्रशांत ठाकूर, सीएसआर प्रमुख गणेश घोडके, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विघ्नेश माळी, सदस्या ज्योती नागावकर, संस्थेचे संचालक, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विविध शाळांचे मुख्याध्यापक, सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका मधुरा भिडे यांनी कार्यक्रमाने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एन. पोरबोले आणि जे. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तांबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेय कमेटीचे योगदान मोलाचे ठरले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
नूतन शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासाला निश्चितच नवी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.