कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर; आधुनिक तंत्रज्ञान व सभासद कल्याणावर भर
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
रोहे शहरातील कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मातोश्री मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेने सभासदांसाठी १५ टक्के लाभांश जाहीर केला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सभासदांसाठी कल्याणकारी योजना आणि दर्जेदार सेवा देत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विवेक वत्सराज यांनी केले.
सभेला अध्यक्ष विवेक वत्सराज, उपाध्यक्ष माधव दाते, तज्ज्ञ संचालक अविनाश दाते तसेच संचालक चंद्रशेखर जोशी, संजीव कवितके, प्रमोद काळवीट, प्रदीप साखळकर, एकनाथ मरवडे, श्रीकांत पिंगळे, यज्ञेश भांड, किशोर पवार, सौ. नीलिमा ओंकार व सौ. विद्या जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिवंगत सभासद तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्ष विवेक वत्सराज, तज्ज्ञ संचालक अविनाश दाते आणि संचालक चंद्रशेखर जोशी यांनी सभासदांच्या विविध शंकांचे समाधानकारक निरसन केले.
यावेळी संस्थेचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, अंदाजपत्रक आदी विषयांचे वाचन करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांच्या मंजुरीनंतर १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
या प्रसंगी राज्य सहकारी संघ, पुणेचे प्रशिक्षक प्रा. एस. बी. वाटाणे यांनी सहकार क्षेत्रातील बदलते कायदे, संस्थेचे सुशासन, सभासदांची जबाबदारी आणि प्रभावी कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत आणि कामकाजाबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले.
सभेचे सूत्रसंचालन सौ. विद्या जोशी यांनी केले, तर सौ. नीलिमा ओंकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.