देशाभिमान, सामाजिक उत्तरदायित्व आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उत्तुंग यश प्राप्त करा – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे प्रथम ,द्वितिय, तृतीय वर्ष पदवी ,पदव्युत्तर वर्गातील व पी.एच.डी. पुरस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज (दि. १३) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता मा. डॉ. कविता लघाटे तसेच जे.बी.एस.पी. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व नगरसेवक परेश ठाकूर, माजी उपमहापौर सिता पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य अॅड. राहुल घरत, गव्हाण ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाऊशेठ पाटील , महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक एकनाथ गायकवाड, आदेश ठाकूर व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली .
स्व.चांगू काना ठाकूर साहेब यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला व पाहुण्यांची ओळख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांनी करून दिली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, शिक्षणाचा वसा आणि संस्कारांचा वारसा जपत समाजातील इतर घटकांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती, आपल्या यशाचा आनंद इतरांसोबत वाटण्याची कला विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. आदरणीय चांगू काना ठाकूर साहेब यांच्या संघर्षमय आणि मूल्याधिष्ठित जीवनातून प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने देखील स्वकीर्ती रूपाने आदर्श समाजासमोर निर्माण करावा, त्याचबरोबर देशाभिमान, सामाजिक उत्तरदायित्व आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच उत्तुंग यश प्राप्त करावे असे सांगितले.
“आजचे जग स्क्रीन आणि तंत्रज्ञानाने व्यापले असले, तरी माहितीच्या महासागरात वाहवत न जाता विद्यार्थ्यांनी भानावर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केवळ मोठे होण्याचे स्वप्न पाहणे पुरेसे नाही, तर ते साकार करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली पाहिजे,” असे प्रतिपादन डॉ. कविता लघाटे यांनी केले यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावामुळे करिअरच्या नव्या संधी आणि आव्हानांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ पदवी मिळवून न थांबता व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली, तर पनवेल तालुक्याच्या वेगवान विकासामुळे येत्या पाच वर्षांत निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या असंख्य संधींचा लाभ युवकांना घेता येईल. त्यासाठी युवकांनी सजग राहिले पाहिजे असा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा, सुसज्ज डिजिटल ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, सकारात्मक शैक्षणिक वातावरण, सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन देणारे व्यवस्थापन व प्राध्यापक वृंद याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगू काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील यांनी कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाचे चेअरमन डॉ. एस. एन. परकाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. डॉ. जि. एस. तन्वर, प्रा. ए. व्ही. पाटील व प्रा. एन. एच. कडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभारप्रदर्शन डॉ. एस. एन. परकाळे यांनी केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.