गोरेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद मेळावा उत्साहात
५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगला मेळावा
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
गोरेगाव (रायगड) येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय दीर्घायू सेंटर इंडिया
या (ILCI), पुणे आणि घरडा केमिकल कंपनी यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातील विविध भागांमधून ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर यांनी भूषविले. पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, कोलाड, इंदापूर आणि गोरेगाव आदी भागांतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघ, पुणेचे माजी अध्यक्ष अरुण माधव रोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येबाबत तसेच त्यांच्या आरोग्य आणि सामाजिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. सध्या जगातील सुमारे १२ टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असून, आरोग्य सुविधा व आधुनिक औषधोपचारांमुळे मानवाचे आयुर्मान वाढत आहे. सन २०७५ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे ३० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा तज्ज्ञांचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने विविध योजना मंजूर केल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मत रोडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासह विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने कार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर यांनी केले. यावेळी रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे रावसाहेब, उपाध्यक्ष एस. एन. गायकवाड, सचिव सुरेश मोरे, अविनाश म्हात्रे, दगडू बामुगडे, मंगेश देशमुख यांच्यासह महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पी. बी. सरफळे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व ज्येष्ठ नागरिकांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महाड येथील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी सादर केलेल्या बहारदार कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यामुळे संपूर्ण मेळाव्याला उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण लाभले.