‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
VRTI, ग्रामपंचायत रोठ बुद्रुक आणि SVRSS यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. SVRSS चे प्रशिक्षक प्रणित कोतवाल व VRTI यांच्या वतीने एक्सेल कंपनीचे सेफ्टी मॅनेजर यांनी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये घ्यावयाची खबरदारी तसेच जीवनरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये आग प्रतिबंध व नियंत्रण, घरगुती अपघात व सुरक्षितता, प्राथमिक उपचार, CPR (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया) तसेच आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची खबरदारी आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थिनी व ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कशी मदत करावी, याबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
‘आवश्यक कौशल्ये शिका… जीवन वाचवा!’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास एम. बी. मोरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरपंच नितीन वारंगे, ज्ञानेश्वर साळुंखे, मंगेश देवकर, विस्तार अधिकारी श्री फडतरे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती अलका बामुगडे तसेच कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
‘सुरक्षित गाव | निरोगी समाज | सक्षम भारत’ या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.