सुर्वे परीवाराच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत महाकाल अवतार समुहाचे चलचित्र दृश्याने मुरुडकर भारावले !
प्रतिनिधी /कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)
सर्वत्र दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.यामध्ये गौरी गणपती सणात आपल्या उपजत कलेला जोपासत वयाच्या ८७ व्या वर्षी सुमारे सहा फूट उंचीचे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे मूर्तीचे चलचित्र स्वतः हाती काढून ५१ वर्षांची परंपरा जपणारे बबन सुर्वे उर्फ फुटाणकर यांच्या गणपती मुर्ती विसर्जन मिरवणूकीतील पुण्याहून आलेल्या महाकाल अवतार समुहाचे चलचित्र दृश्य सादरीकरणाने मुरुडकर अक्षरशः भारावले !
मुळात,ते भंडारी समाजातील सुर्वे कुटुंबात जन्मलेले; परंतु बबन फुटाणकर या नावाने सर्व पंचक्रोशीत प्रचलित आहेत. बालपणी मुरुडमध्ये भट्टीत भाजलेल्या चणे फुटण्याचे एकमेव दुकान होते. त्यावरुन मुरुड पंचक्रोशीत फुटाणकर नावाने ओळखले जाऊ लागले. गणेशोत्सवात सुमारे पन्नास वर्षे शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक सहा फूट उंचीच्या विविध मूर्ती तयार करून दरवर्षी बोधपर सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक वेगवेगळी चलचित्रे उभारून भाविकांमध्ये आपली एक वेगळी छाप उमटविल्याचे येथील पंचक्रोशीमध्ये बोलले जाते. आपली कला जोपासत असताना त्यांनी अनेक कलाकारसुद्धा घडविले आहेत.
यंदा गणपती विसर्जन मिरवणूकीत बबन सुर्वे यांनी पुण्याहून आलेल्या महाकाल अवतार समुहाचे चित्तथरारक दृश्य, शंकर पार्वती स्वयंवर चलचित्र दृश्य सादरीकरणाने मुरुडकर अक्षरशः भारावून गेले ! यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या टिमने चोख कामगिरी बजावत सहकार्य केल्याबद्दल सुर्वे परीवार व महाकाल अवतार समुहाने आभार व्यक्त केले.