रोह्यात रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी; ५० रक्तदात्यांचे उत्स्फूर्त योगदान
रोटरी क्लब रोहा सेंट्रल व जय गणेश मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम
रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते
सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि जय गणेश मित्र मंडळ, भुवनेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तसंक्रमण केंद्र, रायगड यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली.
रक्तदान हेच श्रेष्ठदान मानले जाते. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी आपले योगदान दिले.
यावेळी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण मोरे, जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन माने, उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे डायरेक्टर तसेच रोहा नगरपरिषद सभापती मयूरजी दिवेकर, प्रेसिडेंट इलेक्ट रो. राकेश कागडा, रो. विजय दिवकर, रो. निखिल दाते, रो. राम नाकती, रो. रुपेश पाटील, रो. दिलीप देशमुख, रो. दीपक सिंग, खजिनदार रो. रुपेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी तसेच जिल्हा रक्तसंक्रमण केंद्राच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले. सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उपस्थितांनी कौतुक केले.