कवयित्री संध्या दिवकर यांच्या ‘श्वेतराज’चा रविवारी प्रकाशन सोहळा
साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; ज्येष्ठ नागरिक सभागृहात रंगणार साहित्यिक सोहळा
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
कवयित्री तथा शिक्षिका सौ. संध्या विजय दिवकर यांच्या पहिल्या ‘श्वेतराज’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई वरदा सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड भूषण तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त श्री. एल. बी. पाटील राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, रोहा-अष्टमी नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेंडगे, को.म.सा.प. रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, तसेच साहित्य, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या गझलकारा सौ. ज्योत्स्नाताई राजपूत यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
यशवंतखार या छोट्याशा गावातून साहित्यिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या संध्या दिवकर यांनी प्राथमिक शिक्षिका म्हणून ३७ वर्षांच्या सेवेत ज्ञानदानासोबतच कविता, गीते, गझल, नाटिका, सूत्रसंचालन, चित्रकला व रांगोळी अशा विविध कलांना जोपासले. सामाजिक आणि कौटुंबिक संकटांवर मात करत त्यांनी पुन्हा लेखणी हाती घेत साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला.
कोकण मराठी साहित्य परिषदेशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या कविता विविध साहित्य संमेलनांत आणि दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाल्या. आगरी कविता व गझल लेखनातही त्यांनी योगदान दिले आहे. सध्या त्या को.म.सा.प. शाखा रोहाच्या अध्यक्षा तसेच रायगड जिल्हा महिला प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय असून रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांतून त्यांच्या इयत्ता चौथीच्या वर्गातील पाच बालकवी-कवयित्री घडले असून त्यांनीही कविता लेखनाला सुरुवात केली आहे.
‘श्वेतराज’नंतर त्यांच्या आगामी गझलसंग्रहाचीही तयारी पूर्ण झाली असून साहित्यिक वाटचालीतील या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल संध्या दिवकर यांचे साहित्यप्रेमी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल, ग्रामस्थ मंडळ यशवंतखार, मुंबई व आदर्शनगर, भुवनेश्वर यांच्या वतीने करण्यात आले आहे.